Thursday, 5 February 2015

६७ वर्षांनंतर उलगडले लोकमान्य टिळक !

श्री. नित्यानंद भिसे
    देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल, साबरमतीके संत तुने कर दिया कमाल... या गाण्याने स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या सर्व पिढ्यांच्या मनात आपल्या देशाला केवळ मोहनदास करमचंद गांधी यांच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानामुळेच स्वातंत्र्य मिळाले, हे ठासवण्यात आले. मागील सहा दशके अविरतपणे देशावर राज्य करत असतांना काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या सहा सोनेरी पानांची अगदी शकले केली. त्याला छेद देण्याचे कार्य नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लोकमान्य-एक युगपुरुष या मराठी चित्रपटाने केले आहे. याची प्रचीती हा चित्रपट पाहिल्यावर आली.
संकलक : श्री. नित्यानंद भिसे, मुंबई
१. अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळाले,
असा खोटा इतिहास भारतियांना शिकवला जाणे !
    नुसता व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात आलेल्या इंग्रजांनी काही वर्षांतच एक-एक प्रांत कह्यात घेऊन हा संपूर्ण देश शस्त्रास्त्रांच्या जोरावर पादाक्रांत केला. वर्ष १८५७ चेे स्वातंत्र्ययुद्ध मोडून इंग्रजांनी याच शस्त्रांच्या जोरावर देशातील उरल्यासुरल्या देशप्रेमींच्या विरोधाचाही बीमोड केला. हे इंग्रज म्हणे गांधींनी वारंवार केलेल्या आर्जव-विनंत्या, उपोषणे अशा अहिंसेच्या मार्गाला घाबरून भारत सोडून पळून गेले, असा धादांत खोटा इतिहास काँग्रेसने स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांच्या मनात रुजवल्यानेे काही वर्षांतच मोहनदास करमचंद गांधी हे राष्ट्रपिता बनले. अहिंसेचा मार्ग हाच विश्‍वातील सर्व समस्यांवर एकमात्र विजयमार्ग आहे, असा भास निर्माण करण्यात आला. 
२. काँग्रेसने रुजवलेल्या एकांगी विचारसरणीचे खंडण करणारा चित्रपट !
    या सर्वाचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यापूर्वी ज्या ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलीदान दिले, त्यांचे बलीदान मातीमोल ठरवले गेले. ते सर्वच्या सर्व जण मोहनदास करमचंद गांधी यांच्या समोर खुजे ठरवले जाऊ लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, लाला लजपतराय, चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांसारख्या शेकडो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे महत्त्व न्यून झाले. त्यांचा आक्रमकपणा, त्यांचे क्रांतीकारी विचार हे निषेधार्ह ठरवण्यात आले. या देशावर दीर्घकाळासाठी आणि कायमस्वरूपी सत्ता गाजवता यावी; म्हणून काँग्रेसने केवळ मोहनदास करमचंद गांधी या एकाच व्यक्तीचे उदात्तीकरण केले. या विचारसरणीचे खंडण करण्यास लोकमान्य-एक युगपुरुष हा चित्रपट कारणीभूत ठरला आहे; मात्र त्यासाठी स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे लागली.
३. टिळक या युगपुरुषाची जवळून ओळख करून देणारा चित्रपट !
    ओम राऊत दिग्दर्शित आणि नीना राऊत निर्मित लोकमान्य-एक युगपुरुष हा अत्यंत कलाभिनयाने नटलेला, स्वराज्य आणि सुराज्य या दोन्ही संकल्पनांची सुयोग्य अन् सुस्पष्टरित्या सांगड घालणारा असा
चित्रपट ! हा चित्रपट सध्या तरुणांना चांगलाच भावलेला आहे. मी शेंगा खाल्ल्या नाहीत; म्हणून मी टरफलेे उचलणार नाही आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !, या अवघ्या दोन संवादांपुरतीच आजवर टिळकांची माहिती करून देण्यात आली होती. त्यामुळे आपणास टिळक यापेक्षा अधिक माहीतच नव्हते, अशी प्रांजळपणे स्वीकृती या चित्रपटातील लोकमान्यांची भूमिका वठवणारा अभिनेता श्री. सुबोध भावे यांनी दिली.
४. चित्रपटाच्या नायकाला टिळकांच्या डोळ्यांतून
आक्रमकता, विचारांची सुस्पष्टता आणि संवेदनशीलता जाणवणे !
    या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आपणास लोकमान्य खर्‍या अर्थाने उलगडले आणि त्याचा परिणाम आपल्या विचारप्रक्रियेत झाल्याचे श्री. सुबोध भावे मान्य करतात. एखाद्या व्यक्तीची विचारधारा पालटण्याचे सामर्थ्य लोकमान्यांच्या चरित्रात आहे, असे श्री. भावे यांना यातून सुचवायचे आहे. त्यासाठी जेथे जेथे लोकमान्यांचा पुतळा किंवा छायाचित्र असेल, तेथे जाऊन ते केवळ त्यांचे डोळे निरखत बसायचे. त्यांच्या डोळ्यांतून त्यांना टिळकांमधील आक्रमकता, विचारांची सुस्पष्टता आणि संवेदनशीलता अशा अनेक कलागुणांचा साक्षात्कार झाला. याचे त्यांना चित्रपटात टिळकांची व्यक्तीरेखा साकारतांना मोलाचे साहाय्य झाले.
५. काँग्रेसच्या कुनीतीमुळे भारतीय पिढ्यांना
क्रांतीकारकांच्या जीवनाची माहिती त्रोटक स्वरूपातच मिळणे !
    स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांसमोर काँग्रेसने सावरकर म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्यांनी घेतलेली समुद्रातील उडी, टिळक म्हणजे शेंगांची टरफलेे आणि त्यांनी घेतलेली स्वराज्याची प्रतिज्ञा, नेताजी सुभाष चंद्र बोस म्हणजे त्यांनी चालू केलेली आझाद हिंद सेना, इतक्या त्रोटक स्वरूपात या महान क्रांतीकारकांना जाणीवपूर्वक उलगडवले; म्हणून अभिनेता श्री. सुबोध भावे यांनी टिळकांच्या जीवनासंदर्भात दिलेली प्रांजळ प्रतिक्रिया ही अवघ्या तरुणाईची आहे.
६. स्वतंत्र भारताला सुराज्याकडे घेऊन जाण्यासाठी
टिळकांप्रमाणे संघर्ष करण्याची अपरिहार्यता ठसवणारा चित्रपट !
    हा चित्रपट केवळ टिळकांचे चरित्र उलगडत नाही, तर एका बाजूने लोकमान्यांचा स्वातंत्र्य लढ्यासाठीचा संघर्ष आणि त्याच वेळी दुसर्‍या बाजूने सध्याच्या आधुनिक भारतातील पिढी कशी देशप्रेमापासून दूर जाऊन स्वार्थांध बनत चालली आहे, त्याचे दर्शन घडवतो. ज्या स्वराज्यासाठी टिळकांंनी संघर्ष केला, ते स्वराज्य मिळाल्यानंतर आता सुराज्यासाठी पुन्हा टिळकांसारखाच संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असा मोलाचा संदेश अलगदपणे प्रेक्षकांना देणारा हा चित्रपट खरेतर करमुक्त केला पाहिजे, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये विनामूल्य दाखवला पाहिजे. टिळकांनी चालू केलेल्या गणेशोत्सवाला आता बाजारू स्वरूप आले आहे, त्याला स्पर्धेचे स्वरूप आले आहे, हेही या चित्रपटात अधोरेखित केले आहे.
७. ब्रिटिशांना हिंदु धर्मात ढवळाढवळ करू देणार नाही, असे ठणकावणारे टिळक !
    चित्रपटात दाखवण्यात आलेले समाजसुधारक आगरकर, रानडे आणि टिळक यांच्यातील तात्त्विक वादही अनेक संदेश देऊन जातात. त्याकाळी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या प्रथेवर बंदी आणण्यासाठी ब्रिटिशांना शरण जाऊन कायदा करण्याची मागणी केली. त्याला टिळकांनी प्रखर विरोध केला. ब्रिटिशांना कायदे करून हिंदु धर्मात ढवळाढवळ करू देणार नाही, असे ठणकावून सांगणार्‍या टिळकांचा विचार आजही तंतोतत लागू पडतो. लोकांमध्ये प्रबोधन करून विवाहाचे वय वाढवूया, असा टिळकांनी सुचवलेला मार्ग शेवटी त्यांनी यशस्वीही करून दाखवला. आजही हिंदु धर्मातील प्रथा, परंपरा, सण-उत्सव यांच्यातील गैरप्रकार वाढले आहेत; मात्र अंनिससारख्या तथाकथित समाजसुधारकांनी असेच ब्रिटिशांची वंशावळ असलेल्या काँग्रेस शासनाला शरण जाऊन जादूटोणाविरोधी कायदा असो किंवा मंदिरे ताब्यात घेण्यासाठीचे कायदे असो, असे हिंदुविरोधी कायदे करून हिंदु धर्मियांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी त्याकाळी बळाचा वापर करून समाजसुधारकांना केलेला विरोध सांप्रत काळात काही हिंदुत्ववादी संघटनांच्या रूपाने चालू असल्याचे पाहून थोडेसे समाधान वाटते.
८. टिळकांना आदर्शवत मानून कार्य करणार्‍या काही हिंदुत्ववादी संघटना !
    सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यासांरख्या हिंदुत्ववादी संघटना तथाकथित समाजसुधारक समजणार्‍या पुरोगामी विचारांच्या संघटना आणि अंनिससारख्या नास्तिकवादी संघटनांना हिंदु धर्माच्या विरोधात असणारे कायदे करण्यास वैध मार्गाने विरोध करतात; मात्र त्याच वेळी टिळकांप्रमाणे सण-उत्सव आणि प्रथा-परंपरांमध्ये फोफावत जाणार्‍या  गैरप्रकारांविरोधात हिंदूंचे प्रबोधन करण्याचेही कार्य करतात. हिंदूंना धर्माचे खरेखुरे ज्ञान धर्मशिक्षणाच्या माध्यमातून देतात. आता या कार्याला अधिक व्यापक स्वरूप यावे, हीच अपेक्षा आहे.
९. हिंदु संस्कृतीचे शिक्षण देणार्‍या शाळा चालू करण्याची आवश्यकता !
    ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी काढलेल्या शाळांमधून नुसते कारकून निर्माण होतात; म्हणून बाळशास्त्री चिपळूणकर यांच्या साहाय्याने टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यात हिंदु संस्कृतीचे शिक्षणही देण्यात येऊ लागले आणि सोबत व्यावसायिक शिक्षणही देण्यात येऊ लागले. आजही अशा उद्देशासाठी शाळा चालू करण्याची आवश्यकता कॉन्व्हेंटच्या युगात हरवलेल्या शाळा-महाविद्यालयीन मुलांची दशा पाहून वाटते. लोकांवर अत्याचार करणार्‍या ग्रँडची हत्या करण्यासाठी चाफेकर बंधूंना शस्त्र हाती घेण्यास उद्युक्त करणार्‍या टिळकांनी वर्ष १८९० मध्ये कोकण रेल्वेची संकल्पना मांडली होती, हा गौप्यस्फोट जेव्हा चित्रपटात होतो, तेव्हा टिळकांकडे विकासाच्या बाबतही दूरदृष्टी होती, याचाही साक्षात्कार होतो. केसरी वर्तमानपत्रातून त्यांनी स्वातंत्र्याच्या विचाराला दिलेली धार हे या चित्रपटात अगदी प्रभावीपणे चित्रीत करण्यात आले आहे. स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे टिळक आयुष्याच्या शेवटी श्रीमद्भगवतगीतेचे तत्त्वज्ञान आत्मसात करतात आणि स्वतःच्या आयुष्याला पूर्णाकार देतात; म्हणूनच लोकमान्य-एक युगपुरुष हे या चित्रपटाचे नाव सार्थकी लागते.
१०. टिळकांप्रमाणे सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे जीवनपट उलगडावे !
    हा चित्रपट पाहिल्यानंतर आणखी एक विचार प्रकर्षाने सतावतो. कालपर्यंत काँग्रेसने स्वार्थासाठी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास दाबून ठेवला. त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा जीवनपटही या चित्रपटाप्रमाणे उलगडून नव्या पिढीसमोर आणायला हवा. शाळा-महाविद्यालयांतील इतिहासाच्या पुस्तकांतूनही त्यांची चरित्रे अभ्यासली गेली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा प्रारंभ सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून केला आहे. प्रखर राष्ट्राभिमान गांधींच्या अहिंसावादी विचारांतून नव्हे, तर स्वातंत्र्यसैनिकांच्या वन्दे मातरम् या जयघोषातून जागृत होतो, याचा अनुभव आजही येतो.